सातारा- सुमारे तीन महिन्यांपूर्वी दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पुणे येथील पादत्राण व्यावसायिकाचा खून झाला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित परवेझ हनिफ शेख (वय 42 वर्षे, रा. गंगानगर, हडपसर, पुणे) याला पोलिसांनी अटक केली. संशयिताकडून 3 पिस्तुलासह 40 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले.
याबाबत आधिक माहिती अशी की, चंदन शेवाने यांचा डिसेंबर महिन्यात लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडेगाव परिसरात गोळ्या झाडून खून झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला काही संशयितांची धरपकड करत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. तपासात दोन कोटींच्या खंडणीसाठी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीस मुख्य संशयिताचा शोध घेत होते. मात्र, मुख्य संशयित सातारा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होत होता.
मुख्य संशयित परवेझ शेख याची माहिती पुणे युनिट - 2 च्या पोलिसांना मिळाली. पुणे पोलिसांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिल्यानंतर सातारा पोलिसांनी पथक तयार केले. संशयित परवेझ शेख याला साताऱ्याजवळ संगम माहुली येथे ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता, पोलीस हादरुन गेले. संशयिताकडे तब्बल 3 पिस्तुल व 40 जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करुन संशयिताच्या मुसक्या आवळल्या. प्राथमिक माहितीनुसार परवेझ शेख हा कुख्यात गुन्हेगार असून तोच व्यापारी चंदन शेवाने खून प्रकरणातील मुख्य संशयित आहे. दरम्यान, संशयिताकडे पिस्तुल व जीवंत काडतुसे कोठून आले? तो आतापर्यंत कुठे लपला होता? त्याला कोणी कोणी मदत केली?, असे सवाल उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा -कोरोना व्हायरस: श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधीचे मुखदर्शन आजपासून बंद..