सातारा - तेरा लाखांचे बिल पुढील कार्यालयात मंजुरीला पाठविण्यासाठी 39 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी फलटणच्या वीज वितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मदार वग्यानी (वय 41 रा. फलटण. मूळ रा. सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
पोलिसांच्या माहितीनुसार, 39 वर्षीय तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांनी महावितरण कंपनीमध्ये 13 लाख रुपयांची वीजवाहिन्या अंडरग्राउंड करण्याची कामे केली होती. या कामाचे बिल मंजुरीला पुढील कार्यालयात पाठवण्यासाठी कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी याने त्यांच्याकडे तीन टक्के प्रमाणे 39 हजार रुपये मागितले. या प्रकारानंतर तक्रारदाराने सातारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धाव घेऊन रीतसर तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता वग्यानी हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. आज (मंगळवारी) दुपारी फलटणमधील महावितरणच्या कार्यालयातच वग्यानीला 39 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रंगेहात पकडले.