सातारा - पोलीस कर्मचाऱ्यांना तुमची बदली करून देतो, अशी बतावणी करून भामटेगिरी करणारा एकजण रात्री पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. सातारा, वाई आणि पाचगणी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर त्याने आर्थिक फसवणूकीसाठी जाळे टाकले होते. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याला गजाआड करण्यात यश आले आहे.
माहितीनुसार, एका व्यक्तीने पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना फोनद्वारे पैसे स्वीकारून फसवणूक केली. तसेच नुकतेच साताऱ्यातील पोलिसांनाही फोन करून फसवण्याचा प्रयत्न केला असल्याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळाली. त्यांनी तत्काळ सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून स्वतः या गोष्टीची शहानिशा करून घेतली.
सातारा जिल्ह्याच्या वाई उपविभागांतर्गत असणाऱ्या वाई आणि पाचगणी पोलीस ठाण्यात एकूण तीन कर्मचाऱ्यांना या भामट्याने फोन करुन अपेक्षित ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, तिन्ही कर्मचाऱ्यांनी पैसे पाठवण्यास नकार देऊन त्याचा डाव उधळला. त्याच्यावर दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आणि तत्काळ तपासाला सुरुवात झाली. त्यानंतर, बारा तासांच्या आत या भामट्याचा शोध घेऊन आज त्यास पुणे शहरातून ताब्यात घेण्यात आले.