मलकापूरात 'एक नगरपालिका, एक गणपती' उपक्रम, घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र यंत्रणा
गणेशोत्सवापुर्वी प्रशासनाने एक नगरपालिका, एक गणपतीसाठी आवाहन केले होते. त्याला मलकापूर नगरपालिकेने कृतीशील प्रतिसाद देत शहरात एकाच गणेशमुर्तीची स्थापना केली. आता घरोघरी जाऊन घरगुती गणेशमुर्तींचे संकलन करुन मुर्ती विसर्जनाचे देखील नियोजन केले आहे
कराड (सातारा)- सातारा जिल्ह्यात मलकापूर नगरपालिकेने 'एक नगरपरिषद, एक गणपती' उपक्रम राबविला आहे. तसेच शहरातील घरगुती गणेश मूर्तींचे संकलन करुन विसर्जनाची देखील सोय केली आहे. प्रशासनाच्या आवाहनाला कृतीशील प्रतिसाद देऊन मलकापूर नगरपालिकेने राज्यातील नगरपालिकांपुढे आदर्श ठेवला आहे.
गणेशोत्सवापुर्वी प्रशासनाने 'एक नगरपालिका, एक गणपती'साठी आवाहन केले होते. त्याला मलकापूर नगरपालिकेने कृतीशील प्रतिसाद देत शहरात एकाच गणेशमूर्तीची स्थापना केली. आता घरोघरी जाऊन घरगुती गणेशमूर्तींचे संकलन करुन मूर्ती विसर्जनाचे देखील नियोजन केले आहे. मलकापूर शहरातील प्रत्येक प्रभागासाठी प्रभाग अध्यक्ष, नोडल अधिकारी व श्रीगणेश मूर्ती संकलन करण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रभागनिहाय स्वतंत्र वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 9 ते 7 या वेळेत प्रत्येक प्रभागात ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रभाग अध्यक्ष, नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून नागरिक आपल्या घरगुती गणेश मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी सहकार्य करत असल्याचे मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे आणि उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले.