कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील धामणी गावानजीकच्या शिवारात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. एखाद्या प्राण्याबरोबर झालेल्या झटापटीत गळ्याला झालेली जखम चिघळून त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकार्यांनी वर्तविली आहे.
घटनेची माहिती वन विभागाला कळविली-
धामणी गावातील शेतकरी शिवारात जनावरे चारायला घेऊन गेले होते. त्यावेळी ओढ्याच्या काठावरील एका झुडूपात त्यांना बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. त्यांनी घटनेची माहिती वन विभागाला कळविली. माहिती मिळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल विलास काळे, वन्यजीव अपराध नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वनपाल आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
जखम चिघळून बछड्याचा मृत्यू-
कराड येथील पशुवैद्यकीय रूग्णालयात मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असता बछड्याच्या गळ्याला जखम झाल्याचे आढळले. अन्य प्राण्याबरोबर झालेल्या झटापटीत बछडा जखमी झाला असावा. तसेच ती जखम चिघळून बछड्याचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकार्यांनी काढला आहे.
हेही वाचा-पंतप्रधान मोदी मला सरदार पटेलांपेक्षा मोठे वाटू लागलेत - संजय राऊत