सातारा - झणझणे-सासवड (ता.फलटण) येथे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पाइपलाइनला होल पाडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. हे पेट्रोल जमिनीत मुरल्याने तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पसरल्याने मोठे नुकसान झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी ७ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात लोणंद पोलिसांना यश आले.
संशयितांची कोठडीत रवानगी
याबाबत माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी लोणंद येथे पत्रकार परिषदेत दिली. टोळीचा म्होरक्या अनित हरीशंकर पाठक (वय 32, रा. मूळ गाव पिंडराई पटखान, जि. वाराणसी, उत्तरप्रदेश, सध्या रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), बाळू आण्णा चौगुले (वय 42, रा. रामनगर, चिंचवड, पुणे), मोतीराम शंकर पवार (वय 20, रा. गवळीमाथा, भोसरी, पुणे), इस्माईल पिरमहंमद शेख (वय 62, रा. डीमार्ट शेजारी, पिंपरी पुणे), श्याम शिवाजी कानडी (वय 50, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), स्थानिक शेतकरी दत्तात्रय सोपान लोखंडे (वय 41, रा. सासवड, ता. फलटण, जि. सातारा) व नामदेव ज्ञानदेव जाधव (वय 28 वर्षे, रा. दालवडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. फलटणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व संशयितांची 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
असा झाला प्रकार
सातारा जिल्ह्यातील झणझणे सासवड (ता. फलटण) गावापासून दोन किलो मिटर अंतरावर खडकमाळ नावाच्या शिवारात चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्चदाबाची जमिनीखालील पाइपलाइन फोडली होती. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर या सुमारे २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला चोरट्यांनी सासवड गावाजवळ मोठे भगदाड पाडले होते. या प्रयत्नात सुमारे दोन हजार लिटर पेट्रोल शेजारच्या ज्वारीच्या शेतात पसरल्याने, जमिनीत मुरलेले पेट्रोल आजूबाजूचे विहिरीत उतरले. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले होते.
1 लाख 90 हजारांचे पेट्रोलचे नुकसान
या प्रकारामुळे बाजारभावानुसार सुमारे 1 लाख 90 हजार रुपये किंमतीचे पेट्रोल वाहून जाऊन नुकसान झाले होते. हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड या कंपनीचे सहायक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी लोणंद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत यातील सराईत अंतरराज्य टोळीतील पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना गुन्हे शाखा क्रमांक 2 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या मदतीने पिंपरी चिंचवड परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. या टोळीला मदत करणाऱ्या दोन स्थानिक शेतकऱ्यांनाही पोलिसांनी जेरबंद केले.
गुन्ह्याची कबुली
अधिक तपासात यातील सातही संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांनी अशाप्रकारचे पेट्रोलच्या चोरीसारखे गुन्हे महाराष्ट्रातील अनेक इतर जिल्ह्यांमध्ये केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या संशयितांना लोणंद पोलिसांनी अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहेत.