सातारा -रीयल इस्टेट एजंट मनीष हरिष मिलानी यांना धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या पुण्याच्या तिघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला झाला आहे. बलात्काराच्या केसमधून सुटायचे असेल तर, 50 कोटी रुपयांची मागणी तसेच वडिलांच्या जमिनीचा हिस्सा ड्रायव्हरच्या नावावर करून दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सूर्यवंशी, अशरफ मेहबूब खान व फरयाज कलाजी, अशी संशयितांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील रीयल इस्टेट एजंट मनीष मिलानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वडिलांनी सागर सूर्यवंशी यांना कायदेशीर सल्लागार म्हणून नेमले होते. त्यांच्याकडे अशरफ मेहबूब खान हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. सागर सूर्यवंशी यांनी वडिलांच्या नावाची जमीन परस्पर स्वत:च्या पत्नीच्या नावाने केल्याची बाब एप्रिल 2014मध्ये निदर्शनास आली. त्यानंतर 2015मध्ये ती जमीन बनावट स्टँप वापरून सय्यद हुसेनी नामक व्यक्तीच्या नावाने केल्याचे समजताच मिलानी यांनी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे चिडून सागर सूर्यवंशी यांनी पालघर, भिवंडी, पुणे, वाई, कोरेगाव पोलीस ठाण्यात तिसऱ्या व्यक्तिमार्फत खोट्या तक्रारी केल्या.
50 कोटींची खंडणी मागणाऱ्या पुण्याच्या तिघांवर गुन्हा दाखल - crime news satara
रीयल इस्टेट एजंट मनीष हरिष मिलानी यांना धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या पुण्याच्या तिघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला झाला आहे.

वाई पोलीस ठाण्यात 18 जानेवारी 2020 रोजी दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित कामानिमित्त मनीष हे वाई येथे ऑगस्टमध्ये आले होते. पोलीस चौकशी झाल्यानंतर ते शिवाजी चौकात एका ठिकाणी चहा घेत असताना अशरफ व त्याची पत्नी फरयाज कलाजी तेथे पोहचले. त्यांनी सागरभाई फोनवर आहेत म्हणत फोन दिला. तुला बलात्काराच्या केसमधून सुटायचे असेल तर, 50 कोटी रुपये खंडणी दे किंवा तुझ्या वडिलांच्या जमिनीतील हिस्सा अशरफ व त्याची पत्नी फरयाज हिच्या नावाने करुन दे, असा दम देत सागर याने खंडणी मागितली.
त्यानंतर मनीष मिलानी तेथून पुण्याला निघून गेले. मिलानी यांनी आज वाईत जाऊन फिर्याद दिली. वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिर्के पुढील तपास करत आहेत.