सातारा - पाटण तालुक्यातील बोंद्री गावाच्या हद्दीत बुरंबेश्वर मंदीराच्या पाठीमागे 9 फुटी अजगर आढळला. 25 किलो वजनाच्या या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. अजस्त्र अजगरामुळे गुराखी आणि शेतकर्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अतिवृष्टी आणि महापुरामुळे हा अजगर पाण्याच्या प्रवाहातून वाहून आला असावा, अशी शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.
पाटणमध्ये आढळला 25 किलो वजनाचा 9 फुटी अजगर गुराख्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास...
पाटणपासून काही अंतरावर असलेल्या बोंद्री गावातील बुरंबेश्वर मंदीरापाठीमागे 9 फुट लांबीचा आणि 25 किलो वजनाचा अजस्त्र अजगर दिसला. या घटनेची माहिती गुराख्यांनी सर्पमित्रांना दिली. त्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नानंतर अजस्त्र अजगराला पकडून पोत्यात बंद केले. पाटण तालुका दुर्गम आणि डोंगरी असल्यामुळे लोक आपली जनावरे चरण्यासाठी डोंगरात घेऊन जातात. याच गुराख्यांना बोंद्री गावपोच रस्त्यावरील ओढ्यालगतच्या बुरंबेश्वर मंदिर परिसरात गवतामध्ये अजस्त्र अजगर दिसला. अजगराला पाहून गुराख्यांची भंबेरी उडाली. त्यांनी सर्पमित्र अक्षय हिरवे यांना माहिती दिल्यानंतर अक्षय हिरवे याच्यासह उमेश कुंभार, विनय कुंभार, लखन मोरे हे घटनास्थळी आले. अथक प्रयत्नाने त्यांनी अजगराला पकडून पोत्यात बंद केले.
पाण्याच्या प्रवाहातून सर्प आले वाहून...
पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर ते कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सर्पमित्रांनी पकडलेल्या अजगराला पाचगणीच्या जगंलात सोडून देण्यात आले. अजगराला पकडल्याने गुराख्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अतिवृष्टीमुळे डोंगरात मोठे भुस्खलन होऊन मलमा ओढ्यातून खाली वाहून आला आहे. त्यातून हा अजगर ओढ्याच्या ओढ्याच्या प्रवाहातून खाली वाहून आला असण्याची शक्यता आहे. भुस्खलनाने झालेल्या प्रवाहातून मोठे साप, अजगर ओढ्यातून वाहत गावाच्या दिशेने आले असल्याने दुर्गम भागातील नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. यामुळे वन विभागाने सतर्क राहावे, अशी अपेक्षा बोंद्री गावच्या संजय कांबळे यांनी व्यक्त केली आहे.