सातारा - सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या तीन भीषण अपघातात ८ जण ठार आणि ५ गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत हे कोरेगाव, माण आणि पाटण, तर जखमी वाई तालुक्यातील आहेत. या तिन्ही अपघातातील मृतांमध्ये पाच वृद्ध आणि तीन तरूणांचा समावेश आहे. रस्त्यातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने इर्टिका कार झाडाला धडकल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 31 जुलै) रात्री दहाच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील सुर्ली गावच्या हद्दीत घडली. सातारहून कोरेगावकडे जात असताना हा अपघात झाला होता. अपघातात तुकाराम आबाजी माने (वय 65), तानाजी अनंत माने (वय 62) आणि सुभाष गणपत माने (वय 60) यांचा जागीच मृत्यू झाला.
कार-मोटरसायकल अपघातात तीन तरूण जागीच ठार :सातारा-पंढरपुर महामार्गावर गोंदवले खुर्द हद्दीत स्विफ्ट कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलवरील तिन्ही तरूण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले. मंगळवारी (दि. २) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरूण हे पळशी (ता. माण) येथील होते. तुषार लक्ष्मण खाडे वय ( वय २२ ), अजित विजयकुमार खाडे वय (वय २३ ) आणि महेंद्र शंकर गौड (वय २१ ), अशी मृतांची नावे आहेत. स्विफ्ट चालक गणेश आनंदराव ढेंबरे आणि आनंदराव ढेंबरे हे गंभीररित्या जखमी झाले, तर ५ वर्षांचा नातू विहान हा आश्चर्यकारकरित्या अपघातातून बचावला.