सातारा - फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे जमिनीच्या वादातून वृध्देचा झोपडीसह जाळल्याचा बनाव रचण्यात आला होता. पोलिसांनी कौशल्याने तपास करून हा बनाव रचणाऱ्या फिर्यादी महिलेसह ८ जणांना अटक केली. या गुन्ह्यात यापुर्वी अटकेत असलेल्या चौघांना फौजदारी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर मुक्त करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील माहिती देताना. फिर्यादीचा बनाव -
झोपलेल्या वृद्धेचा जागेच्या वादातुन झोपडी पेटवून खुन केल्याची फिर्याद कल्पना अशोक पवार (वय 45, रा.अलगुडेवाडी, ता.फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. सासऱ्याने खरेदी केलेल्या जागेच्या वादातून कुंडलिक कृष्णा भगत, सतिश भगत, राजु प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनिल मोरे या पाच जणांनी मारहाण करत वादग्रस्त झोपडी पेटवली. त्यात झोपलेल्या महुली उर्फ मौली या वृध्देचा जाळुन खुन करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले होते. फलटण पोलिसांनी खुन व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवला. कुंडलिक कृष्णा भगत,सतिश भगत, राजु प्रल्हाद मोरे व कुमार मच्छिंद्र मोरे या चौघांना अटक करण्यात आली होती.
जबाबात आढळली तफावत -
या गुन्ह्याचा अधिक तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्या जबाबात तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली. जागेच्या वादाचा विषय कायमचा निकालात काढण्यासाठीच यातील फिर्यादी व तिच्या कुटुंबियांनीच महुली उर्फ मौली या वृध्देच्या डोक्यात दगड घालून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ती अर्धमेली झाली असताना अंगावर पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून या कुटुंबियांनी स्वत:ची राहती झोपडी जाळुन खुन केला. तसेच या सर्वाबाबत जागेचा वाद असलेल्या कुटुंबियांची नावे फिर्यादीत घेतल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या संशयितांवर वॉच ठेवला होता. दरम्यान, घटना घडल्यापासून झबझब पवार हिच्या घरातील दोघे पसार झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, कसून चौकशीला सुरूवात केल्यानंतर हा सगळा बनाव उघड झाला.
हेही वाचा -जळगाव अपघात : आभोड्यातील एकाही घरात पेटली नाही चूल; 11 जणांची एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा
इतर संशयितांच्या मागावर -
या गुन्ह्यात यातील मूळ फिर्यादी कल्पना अशोक पवार हिच्यासह तिचा पती अशोक झबझब पवार, ज्ञानेश्वर उर्फ कमांडो उर्फ किमाम अशोक पवार, गोपी अशोक पवार, विशाल अशोक पवार, रोशनी रासोट्या काळे, काजल उर्फ नेकनूर पोपट पवार, मातोश्री ज्ञानेश्वर पवार (सर्व रा. अलगुडेवाडी, ता.फलटण) यांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही संशयितांची लवकरच नावे निष्पन्न होतील, असे धीरज पाटील यांनी स्पष्ट केले. संशयितांनी पोलिसांजवळ गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृतदेहाच्या पंचनाम्याचा आलेला अहवाल आत्ताच्या गुन्ह्याला सुसंगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.