कराड (सातारा)- लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणार्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७१.४४ टक्के मतदान झाले आहे; तर कराड उत्तरमध्ये ६८.७ एवढी मतदानाची टक्केवारी नोंदली आहे. दोन्ही मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत आहे. यामध्ये दक्षिणच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -राज्यात विधानसभेसाठी ६१.१३ टक्के मतदान, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती
कराड दक्षिणमध्ये महाआघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात तिरंगी लढत आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या उमेदवारांच्या प्रचार संभांना मिळालेला प्रतिसाद आणि चुरशीने झालेले मतदान पाहता कराड दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार, याची उत्सुकता ताणली आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही तिरंगी लढत झाली असून मागील निवडणुकीतील बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे तिघेही या निवडणुकीत पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. मनोज घोरपडे मागील निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर आणि धैर्यशील कदम हे काँग्रेसच्या चिन्हावर लढले होते. या निवडणुकीत कदम शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आणि घोरपडे हे अपक्ष म्हणून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात रिंगणात होते. कराड दक्षिण मतदारसंघातही यंदा काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीचा तिढा अखेरपर्यंत होता. त्याचप्रमाणे कराड उत्तर मतदारसंघ भाजप की शिवसेनेच्या वाट्याला जाणार, याचा सस्पेन्स होता. अखेर काँग्रेसची अधिकृत उमेदवारी पृथ्वीराज चव्हाण यांनाच मिळाली आणि कराड उत्तर मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे राहिला.
हेही वाचा -वरळीत 1 लाख 29 हजार मतदान; आदित्य ठाकरेंना सव्वालाख मतं मिळण्याचा दावा ठरणार फोल
कराड दक्षिणसह कराड उत्तरमध्ये कराड तालुक्यातील ९४ गावे, खटाव तालुक्यातील २६, कोरेगाव ३७ आणि सातारा तालुक्यातील ३८ गावांचा समावेश आहे. एकूण २ लाख ९२ हजार ३९ मतदारांपैकी १ लाख ९८ हजार ७७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कराड दक्षिणमध्ये कराड आणि मलकापूर, अशा दोन नगरपालिकांचा समावेश आहे. शहरी मतदारांमुळे या मतदारसंघातील प्रमुख तिन्ही उमेदवारांना बरेच प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कराड दक्षिणमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. आता संपूर्ण राज्याचे लक्ष कराड दक्षिणच्या निकालाकडे लागले आहे.