सातारा - शेअर्समध्ये घोटाळा करुन वृद्धाची तब्बल 70 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्ता शामराव नरगुंदे (वय ७०, रा. यादोगोपाळ पेठ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आरोपीने डिमॅट अकाऊंट धारकाच्या बनावट सह्या केल्या. शेअर अकाऊंटशी संलग्न मोबाईल क्रमांक परस्पर बदलून सात हजार शेअरची अफरातफर केली. याप्रकारे त्याने नरगुंदे यांची तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी डीमॅट अकाऊंटचे व्यवहार पाहणारा रोहित शिवाजी शेळके (रा. शेळकेवाडी, ता. सातारा), आयडीबीआय बँकेतील शाखा व्यवस्थापक, डिमॅट खात्याचे व्यवहार पाहणारे आणि सहीची शहानिशा करण्याचे अधिकार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दत्ता शामराव नरगुंदे (वय ७०, रा. यादोगोपाळ पेठ) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारदार दत्ता नरगुंदे यांनी १९८० पासून शेअर खरेदी करण्यास सुरुवात केली. ही खरेदी आणि विक्री ते ब्रोकरमार्फत करत होते. सुरुवातीला त्यांचे आणि पत्नीचे अशी दोघांची संयुक्त खाती होती. मात्र, पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी २०१५ साली संयुक्त खाते बंद केले आणि स्वत:च्या खात्यावरून खरेदी सुरू केली. त्यांनी महाराष्ट्र स्कुटर, एशियन पेंट्स, ब्ल्यूस्टार, सिप्ला, ग्रासीम, अल्ट्राटेक अशा विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले होते.