कराड (सातारा)- साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर येथे शुक्रवारी पहाटे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेतील ६ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती आले आहेत. एनडीआरएफकडून आंबेघर गावात वेगाने मदतकार्य सुरू आहे. मात्र, पाऊस आणि चिखलामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.
पाऊस, चिखलामुळे मदत कार्यात अडचणी
पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथे शुक्रवारी पहाटे भूस्खलन झाले. आंबेघर गावावर दरड कोसळून गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेची माहिती समजताच प्रशासकीय अधिकारी तातडीने आंबेघर गावाकडे रवाना झाले होते. परंतु पावसाची संततधार आणि रस्त्यावर पाणी आल्यामुळे एनडीआरएफच्या टीमला देखील घटनास्थळी लवकर पोहोचता आले नाही. अखेर कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून रबरी बूट आणि लॉन्चमधून एनडीआरएफचे पथक आंबेघरमध्ये पोहोचले. गावात पोहोचताच मदतकार्याला सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत ६ जणांचे मृतदेह आढळले आहेत. पाऊस आणि चिखलामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. या दुर्घटनेत नेमका किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले आहेत, याची आकडेवारी मदतकार्य पूर्ण झाल्यानंतर हाती येईल.