कराड (सातारा) - कृष्णा हॉस्पिटलमधील उपचाराने बरे झालेल्या रुग्णसंख्येंने पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनामुक्तीचे ५ वे शतक पूर्ण करणारे कृष्णा हॉस्पिटल सातारा जिल्ह्यातील रुग्णांसाठी संजीवनी ठरले आहे. आतापर्यंत या रुग्णालयात उपचार घेऊन ५०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कृष्णा हॉस्पिटल ठरले संजीवनी; आतापर्यंत ५०० जणांची कोरोनावर मात
कृष्णा हॉस्पिटलमधील उपचाराने बरे झालेल्या रुग्ण संख्येंने पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनामुक्तीचे ५ वे शतक पूर्ण करणारे कृष्णा हॉस्पिटल सातारा जिल्ह्यातील रुग्णांसाठी संजीवनी ठरले आहे. आतापर्यंत या रुग्णालयात उपचार घेऊन ५०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनावर मात केलेल्या १६ जणांना शनिवारी कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये कराड तालुक्यातील ९, तर पाटण तालुक्यातील ७ जणांचा समावेश होता. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते कोरोनामुक्त रुग्णांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, राजेंद्र सनदे, योगेश कुलकर्णी, डॉ. संजय पाटील, डॉ. सतीश पाटील, रोहिणी बाबर, कविता कापूरकर, संध्या जगदाळे यांच्यासह रूग्णालयाचा वैद्यकीय स्टाफ उपस्थित होते.
कोरोनाचे संकट मोठे आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल सज्ज आहे. आधुनिक सुविधा आम्ही उपलब्ध केल्या आहेत. परंतु, नागरीकांनी स्वत: काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.