सातारा - कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सामान्य जनतेत भितीचे वातावरण आहे. रुग्णांनी रविवारी रात्री सतराशेचा टप्पा पार केला आहे. मुंबईकडून देखील गावाकडे परतणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाबाधितांमध्ये अनेक जण मुंबई, ठाणे पुणे या ठिकाणाहून आलेले आहेत. दरम्यान प्रशासन यंत्रणा सतर्क झाली असून बाधित गावांमध्ये कडक उपाययोजना राबवून गावे सील करत आहे.
माण तालुक्यातील वावरहीरे, दानवलेवाडी व मोही येथील तिघेजण ठाणे आगारात एसटी चालक असून ते 30 जूनला ठाणे येथून एका खासगी गाडीने गावी आले होते. गावी परतल्यावर तिघांनाही गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तसेच दहिवडी येथील कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी वावरहिरे, दानवलेवाडी येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर मोही येथील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला.