कराड (सातारा) -कराडच्या वाखाण रोडवरील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 90 हजाराची रोकड आणि दागिने मिळून 4 लाख 90 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. घर मालक मुंबईला गेल्यानंतर चोरट्यांनी हा डाव साधला. याप्रकरणी अवधूत भरतसा कलबुर्गी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार अवधूत कलबुर्गी यांची मुलूंड (मुंबई) ही सासरवाडी आहे. 11 जून रोजी ते कुटुंबीयांसह मुलूंडला गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कराडच्या प्रकाशनगर भागात वाखाण रोडवर असलेल्या त्यांचे बंद घर फोडले. घरातील कपाटात ठेवलेली 90 हजाराची रोकड तसेच दोन तोळ्याचे लेडीज ब्रेसलेट, 12 ग्रॅमची नथ, 6 ग्रॅमची सोनसाखळी, 3 ग्रॅमची अंगठी, 10 ग्रॅमची चांदीची तीन ब्रेसलेट, 900 ग्रॅमचा चांदीचा तांब्या, 90 ग्रॅमचे चांदीचे तीर्थपात्र, चमचा, 2 निरंजन, कुंकवाचा करंडा, कानातील सात कुड्या, असा एकूण 4 लाख 90 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.