सातारा -कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात तब्बल 22 हजार 956 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 37.27 टीएमसी इतका झाला आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून वीज निर्मितीनंतर 2 हजार 167 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. विभागात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना, केरा, मोरणा, काजळी, काफना नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 22 हजार 956 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सिंचनासाठी 2 हजार 167 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची सध्याची स्थिती पहाता येथे एकूण उपलब्ध पाणीसाठा 37.27 टीएमसी, पाणी उंची 2089.06 फूट, जलपातळी 636.88 मीटर इतकी झाली आहे.