सातारा - महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा सिमला-मनालीतील 'मॉल रोड'च्या धर्तीवर विकास करण्यात येणार असून महाबळेश्वरमधल्या ऐतिहासिक इमारतींचं पुरातन सौंदर्य कायम ठेवून सुशोभीकरण, रस्त्यांवरील वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्याची कामे, शहरात पर्यटन विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची निर्मिती आदी विकासकामांसाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील बैठकीत मंजूर करण्यात आला.
पर्यटनवाढीला प्रोत्साहन
सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक झाली. विकासकामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कामे पूर्ण झाल्यानंतर महाबळेश्वरचे सौंदर्य अधिक खुलेल आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.