कराड (सातारा)- पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील पाल गावात, खंडोबा यात्रा मिरवणूक मार्गावर नवीन पूल बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. या पुलासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने कराड तालुक्यातील पाल गावात खंडोबा यात्रा मिरवणूक मार्गावर नवीन पूल बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामाच्या मंजुरीचा शासन आदेश बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपुर्त केला.
तीन कोटी रूपयांची तरतूद -
पालीचा खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. खंडोबाच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. तसेच यात्रेसाठी दरवर्षी 6 ते 7 लाख भाविक उपस्थित असतात. यात्रेवेळी मुख्य पालखी सोहळा तारळी नदीपात्रातून जातो. यात्रा काळातील गर्दीमुळे गैरसोय होते, म्हणून तारळी नदीपात्रात पर्यायी मार्गासाठी नवीन पुलाची गरज होती. श्री खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी आणि कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील हे नवीन पुलासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते, त्याची दखल घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या पुलासाठी निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खंडोबा देवस्थानाचे महत्व जाणून नवीन पुलास मंजुरी दिली. नवीन पुलामुळे खंडोबाच्या यात्रा काळात मिरवणूक मार्गावर सुसूत्रता येणार असून दळणवळणाचीही सोय होणार आहे.
हेही वाचा- पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या.. आरोपी पतीचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण