सातारा - जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांच्या सक्षमीकरणासाठी 1 टक्का अर्थसहाय्य निधी देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सन 2014 - 15 वर्षासाठी पाठवलेल्या प्रस्तावापोटी 3 कोटी 4 लाख 95 हजार रुपये सरकारने मंजूर केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
ते म्हणाले, ही रक्कम लवकरच संबंधीत विकास सेवा संस्थांना मिळणार आहे. उर्वरित 2 वर्षांचीही रक्कम मिळवण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना सेवा देणाऱ्या विकास सेवा संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिल्हा बँक व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. पीक कर्ज वाटपात विकास सेवा संस्थांचे नुकसान होत असल्याने जिल्हा बँकेने केलेल्या पाठपुराव्यास अनुसरून राज्य सरकारने विकास संस्था सक्षमीकरणासाठी पीक कर्ज वाटपावर 1 टक्का अर्थसहाय्य निधी देण्याचा निर्णय सप्टेंबर 2014 मध्ये घेतला आहे.
त्यास अनुसरून सन 2014-15 या वर्षात 692 विकास सेवा संस्थांना 4 कोटी 72 लाख 16 हजार, सन 2015 - 16 मध्ये 747 विकास संस्थांना 5 कोटी 31 लाख 94 हजार व सन 2016 - 17 मध्ये 729 विकास सेवा संस्थांना 4 कोटी 93 लाख, असे एकूण 14 कोटी 97 लाख 11 हजार रूपये अनुदान मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. मात्र, गेल्या 6 वर्षे हे प्रस्ताव शासन स्तरावरून प्रलंबित होते.