सातारा -जगभराला कोरोनाची झळ बसली असताना जिल्ह्यातील 27 गावांनी दोन्ही लाटांमध्ये या साथरोगाला हद्दी बाहेर रोखण्यात यश मिळाले. महाबळेश्वर, सातारा, पाटण, वाई व जावळी तालुक्यातील ही गावे आहेत. या गावांमध्ये कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अद्यापपर्यंत एकही बाधित आढळून आला नाही. यातील सायळी (ता. सातारा) या गावाने आदर्श प्रणालीचा अवलंब करत कोरोनाला ग्रामस्थांपासून दोन हात दूर ठेवले.
सायळी येथील 'ईटीव्ही' चा ग्राउंड रिपोर्ट 27 गावांमध्ये एकही बाधित नाही -
पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्याला सर्वाधिक कोरोनाची झळ बसली. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 79 हजार 751 कोरोना बाधित आढळून आले. जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर बाधितांची सरासरी तब्बल 45 टक्क्यांपर्यंत पर्यंत पोचली होती. जिल्ह्यात इतकी भयावह परिस्थिती असताना सातारा जिल्ह्यातील तब्बल 27 गावांनी कोरोनाला गावच्या वेशीवर रोखण्यात यश मिळवले. अर्थातच ग्रामस्थांची एकी व शासनाच्या विविध निर्देशांचे काटेकोर पालन यामुळे ग्रामस्थांना याचे सर्व श्रेय द्यावे लागेल.
सायळी येथील 'ईटीव्ही' चा ग्राउंड रिपोर्ट सायळीची बिनविरोध परंपरा -
आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने यातील सातारा तालुक्यात सायळी या गावाला भेट देऊन तिथला ग्राउंड रिपोर्ट घेतला. सायळी हे सज्जनगडाच्या उत्तरेला, साताऱ्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील गाव. सुमारे आठशे लोकसंख्येच्या या गावातील 300 ते 350 लोक नोकरी, व्यवसाय व रोजगारानिमित्त मुंबईला असतात. 1975 साली सायली ग्रामपंचायत अस्तित्वात आली. आजपर्यंत ग्रामपंचायतीची एकदाही निवडणूक झाली नाही. ग्रामपंचायत असो वा सेवा सोसायटी ग्रामस्थांनी एकमुखी कारभार करत बिनविरोध कार्यकारणी निवडण्याचा पायंडा पाडला; जो आज अखेर सुरू आहे. याच एकीमुळे आम्हाला कोरोनापासून सर्वांचा बचाव करत आला, असे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.
विलगीकरणाला प्राधान्य -
"मुंबईहून अथवा साताराहून आपल्या गावी येणा-या ग्रामस्थांना आम्ही 14 दिवस विलगीकरणात ठेवण्याची काळजी घेतली. ज्या लोकांच्या घरांमध्ये पुरेशी सोय नाही अशांसाठी गावातील शाळेमध्ये विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. 14 दिवस विलीगीकरणात राहिल्यानंतरच त्या ग्रामस्थांना घरी सोडण्याची काळजी घेतली जाते" असे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव सावंत यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
95 % लसीकरण -
"45 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले. 95 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शिवाय ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी सँनिटेशन करत आहोत. गावातील मुंबई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक कुटुंबाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप केले. त्याचाही चांगला फायदा झाला. प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी, अंगणवाडीसेविका यांचेही वेळोवेळी गावाला प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्याप्रमाणे ग्रामपंचायत गावात आरोग्यविषयक उपक्रम राबवत असल्याचे सायळीचे उपसरपंच विकास देवरे यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच यश -
गावात येणाऱ्या - जाणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जाते. एखादा आजारी असल्यास माहिती घेणे, विचारपूस करणे, उपचारांबाबत पाठपुरावा केला जातो. सामाजिक अंतर, सँनीटायझरचा वापर आदींबाबत वेळोवेळी जागृती करण्यात आली असल्याचे सायळीच्या स्नूषा व पंचायत समिती सदस्य विद्या तानाजी देवरे यांनी सांगितले. "गाव एकसंघ असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाय योजना राबवताना काहीही अडचण आली नाही. उलट ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळाल्याने आम्हीं कोरोनापासून गावाला लांब ठेवू शकलो, असे पोलीस पाटील मनोज देवरे यांनी सांगितले.
कोरोनाला वेशीवरच रोखणाऱ्या जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायती -
- जावळी : गोंदेमाळ, कारगाव, भालेघर व कोळघर
- सातारा : वेणेखोल, सायळी, वडगाव व पुनवडी
- पाटण : नेचल, नानेल, पाचगणी, काहीर, वाडीकोतावडे, भांबे, पाळशी, पाणेरी व सातर
- वाई : ओहळी
- महाबळेश्वर : आमशी, रामेघर, शिंदी, वलवन, आकल्पे, निवळी, आरव, मोरणी व उचाट
हेही वाचा - ईटीव्ही ग्राउंड रिपोर्ट - जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर विकास की भकास?