सातारा- पाचगणी येथील बेल एअर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेली 23 वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली. यामुळे कोरोना सेंटरमध्ये खळबळ उडाली होती. पण ती तरुणी मुंबईत स्वगृही गेल्याचे कळाले, यामुळे पाचगणीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, ती मुंबईला कशी पोहोचली? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेंबूर येथील एक 23 वर्षीय तरुणी त्याच्या वडिलाच्या उपचारासाठी पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये आली होती. तिच्या वडिलांवर उपचार सुरू होते. या दरम्यान, त्या तरुणीमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून आले. तेव्हा त्याची चाचणी करण्यात आली. यात ती पॉझिटिव्ह ठरली. यामुळे तिच्यावर बेल एअर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ती अचानक बेपत्ता झाली. तेव्हा रुग्णालय प्रशासनाने पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने त्या तरुणीचा पाचगणी व परिसरात शोध घेतला. परंतु ती कुठेही सापडली नाही. सायंकाळी उशिरा तिच्या घरी फोनवरून संपर्क केला असता, ती मुंबईत तिच्या आईकडे पोहोचल्याचे समजले. यामुळे पाचगणीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.