कराड (सातारा)- जिल्ह्यात एकीकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरीपार गेला असताना कोरोनामुक्त होणार्यांची संख्याही शंभरीकडे गेली आहे. बुधवारी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील 20 आणि सह्याद्री हॉस्पिटलमधील 3 असे एकूण 23 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे अर्धशतक पूर्ण केले असून सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 98 झाली आहे.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत एकूण 77 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. त्यापैकी 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर उर्वरित 23 जणांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी तब्बल 20 जण कोरानामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये दीड महिन्याचा बाळापासून ते सत्तर वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सर्व कोरोनामुक्त रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, आत्तापर्यंत 54 जणांना बरे करण्यात आम्हाला यश आले आहे. उर्वरित 23 रुग्ण देखील लवकरच कोरोनामुक्त होतील. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डची संख्या आम्ही वाढविणार आहोत, असेही डॉ. भोसले म्हणाले.
उंब्रजमधील बालरोग तज्ज्ञही कोरोनामुक्त -
डेरवण (ता. पाटण) येथील कोरोना पॉझिटिव्ह बाळावर उपचार करताना कोरोनाची लागण झालेल्या उंब्रज (ता. कराड) येथील 40 वर्षीय बालरोग तज्ज्ञांवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. जीवाला धोका असला तरी रुग्णसेवा करणे हे आमचे कर्तव्य असून भविष्यातदेखील मी माझे कर्तव्य करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
एकाच दिवसात कराडमधील 23 जण कोरोनामुक्त; कोरोनामुक्तांची संख्या शंभरीकडे