महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात मुघलकालीन सुवर्ण मोहरांची खणखण; 216 नाणी संग्रहालयात दाखल - सातारा मुघलकालीन सुवर्ण मोहरा न्यूज

पुण्यातील चिखली या ठिकाणी सापडलेल्या २१६ सोन्याच्या मोहरा साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आणल्या आहेत. या मोहरा मुघलकालीन असल्याची शक्यता आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Museum gold coins news
सातारा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय न्यूज

By

Published : Mar 14, 2021, 12:48 PM IST

सातारा -छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त असलेल्या साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात 216 सोन्याच्या मुघलकालीन मोहरा दाखल झाल्या आहेत. या मोहरा सिराजुद्दीन मुहम्मद शाह बहादुर दुसरा यांच्या काळातील असाव्यात, असा अंदाज मोहरांवरील भाषेवरून बांधला जात आहे. 1835 ते 1880 या कालखंडातील या मोहरा असण्याची शक्यता शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केली.

216 नाणी संग्रहालयात दाखल झाली आहेत
दोन कोटींचे घबाड -

पुणे जिल्ह्यात चिखली (पिंपरी चिंचवड) येथे एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते. हे काम करताना दोन मजुरांना या मुघलकालीन सोन्याच्या मोहरा आढळल्या. चरवीच्या आकाराच्या मोठ्या गडव्यामध्ये या मोहरा ठेवलेल्या होत्या. या मोहरांचे वजन साधारण दोन किलो 357 ग्रॅम इतके आहे. या सोन्याची किंमत दोन कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे. मात्र, या मोहरा इतिहासकालीन असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य 10 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

'असा' लागला शोध -

या मोहरा पिंपरी-चिंचवड येथे घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना मजुरांना सापडल्या. याबाबतची माहिती शासनाला न देता ते मोहापायी घरी घेऊन गेले. मात्र, मोहरांच्या वाटणीवरून दोघांमध्ये वाद झाला. पुणे पोलिसांना या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन या 216 मोहरा हस्तगत केल्या. भारतीय पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांच्या प्रयत्नातून या मोहरा सातारा वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

अधिक अभ्यासाची गरज -

ही नाणी इतिहासकालीन असली तरी त्याचा नेमका कालखंड तपासण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. पुरातत्व विभागाची समिती ही नाणी अभ्यासून नंतर ती कोणत्या राजाच्या राजवटीमधील आहेत हे स्पष्ट करील असेही शिंदे यांनी सांगितले.

नव्या इमारतीत मोहरा पाहता येणार -

शिवाजी संग्रहालयाची आताची इमारत छोटी आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलाच्या शेजारी अडीच हजार चौरस फूट भागात संग्रहालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. येत्या सहा ते आठ महिन्यात वस्तुसंग्रहालयाचे कामकाज नव्याने सुरू होईल. त्यावेळी तेथे स्वतंत्र दालनात ही नाणी नागरिकांना पाहता व अभ्यासता येणार, असल्याचे प्रवीण शिंदे यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details