महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 14, 2020, 5:40 PM IST

ETV Bharat / state

पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक; पाच जणांवर गुन्हा दाखल

पैशाचा पाऊस पाडून पैसे दुप्पट-तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने 21 लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पैसे
पैसे

कराड (सातारा)- पैशाचा पाऊस पाडून पैसे दुप्पट-तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अनिल मनोहर वासुदेव (वय 34, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून दत्तात्रय रामचंद्र डवर (रा. डवरवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), महाराजाच्या वेशातील जटाधारी व्यक्ती (वय 75), महाराजाचा सेक्रेटरी प्रमोद पाटील (वय 40), अमोल दिलीप सावंत (वय 32, रा. सोनगिरवाडी, वाई, जि. सातारा), जगन्नाथ गणपत टिके (वय 57, रा. कडेगाव, ता. वाई) अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार अनिल वासुदेव संशोधक आहेत. त्यांची अर्थिक परिस्थिती चांगली आहे. तसेच ते प्राप्तिकर दाता आहेत. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारे इचलकरंजीतील गिरीश नारायण जाधव यांनी दोन महिन्यापूर्वी शांतीकुमार डोंगरे यांच्याशी अनिल वासुदेव यांची ओळख करून दिली. गिरीश जाधव हे अनिल वासुदेव यांच्या कार्यालयामध्ये असताना दि. 5 मार्चला डोंगरे हेही तेथे आले. त्यांनी प्रात्याक्षिक दाखवायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी डोंगरे हे वासुदेव यांच्या कार्यालयामध्ये आले. त्यांनी कराड येथील मित्र विनोद चव्हाण (रा. मनव, ता. कराड) सुहास माटेकर (रा. नांदगाव, ता. कराड) या दोन मित्रांना बोलावून घेतले. त्या दोघांनी वासुदेव यांना सांगितले की, एक महाराज जमिनीतून पैसे काढून दाखवितात. पैशाचा पाऊस पाडतात.

हेही वाचा -भारतीय प्रजातीच्या कासवाची तस्करी करणारे दोघे ताब्यात

अनिल वासुदेव यांना या सर्व प्रकाराचा संशय आला. परंतु, या लोकांना पकडून देण्याच्या उद्देशाने ते आरोपी सांगतील तसे करण्यास तयार झाले. अनिल वासुदेव हे आरोपींसमवेत गुरुवारी (दि. 12) पाचवड फाटा (ता. वाई) येथून तीन किलोमीटर अंतरावरील एका घरी गेले. तेथे अंगाला राख फासलेला 75 वर्षीय वयाचा जटाधारी व्यक्ती होता. अनिल वासुदेव यांनी आणलेली 21 लाख रूपयांची बॅग उत्तमकुमार डोंगरी यांच्याकडे दिली होती. ती बॅग महाराजाने आणायला सांगितली. बॅगेतील पैसे महाराजाने विटांच्या बॉक्समध्ये ठेवून पूजा सुरू केली. त्यानंतर पैसे येऊ लागले. ते पैसे भरण्यासाठी महाराजाने बॅग आणायला सांगितली. ती बॅग अनिल वासुदेव यांना गाडीत ठेवायला सांगितली. बॅग उचलताना वासुदेव यांना बॅगेत दगड असल्याची शंका आली. महाराज दिवटी पेटवून हावभाव करू लागल्याने उत्तमकुमार डोंगरे यांना कपड्यातच लघवी झाली. ते पाहून इतर लोक हसू लागले. त्यामुळे महाराज चिडले आणि शिव्याशाप देऊ लागले. तुमचे काम खराब झाले. तुमच्या बॅगेतील पैशाचे दगड झाले आहेत. बॅग घेऊ या, असे ते म्हणाले. गाडीतून बॅग आणून पाहिले असता बॅगेत दगड आढळून आले.

हेही वाचा -रंगाचा बेरंग ! रंगपंचमीच्या इव्हेंटवर सातारा पोलिसांची 'धुवून टाक' कारवाई

महाराजाने त्यांना पाच लिंबू दिले. त्यातील चार लिंबू पाण्यात सोडा आणि एक जवळ ठेवायला सांगितला. तसेच तीन महिन्यांनी परत या. तुम्हाला पैसे तयार करून देतो, असे सांगून सर्वांना जायला सांगितले. तेथून परतत असताना अनिल वासुदेव यांनी मित्राच्या मदतीने कराडचे डीवायएसपी सूरज गुरव, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यामुळे डीवाएयसपी गुरव यांनी तासवडे टोलनाक्यावर तिन्ही गाड्या पकडल्या आणि सर्वांना कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पैशाचा पाऊस पाडून पैसे दुप्पट-तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने आपली 21 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल वासुदेव यांनी तक्रार दिली. त्यावरून कराड शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details