कराड (सातारा)- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन पीडित मुलीस कुमारी माता ( Abusing Minor Girl ) बनविणार्या आरोपीस कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. एस. होरे यांनी 20 वर्षे सश्रम कारावास ( Rigorous Imprisonment ) आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राकेश सदाशिव कांबळे (वय 30 वर्षे, रा. शनिवार पेठ, कराड), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सोबतीसाठी बोलाविलेल्या आरोपीकडून अत्याचार -पीडित मुलीच्या कुटुंबात कोणीही पुरुष नसल्यामुळे कुटुंबियांनी आरोपीला सोबतीसाठी घरी झोपण्यास बोलविले होते. त्यावेळी आरोपी राकेश कांबळे याने मुलीशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिली. तीला यशवंतनगर-सांगली येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या स्वाधारगृहात पाठविण्यात आले. सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मुलीने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी दि. 30 नोव्हेंबर, 2019 रोजी पीडित मुलीने कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून आरोपीवर अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.