सातारा -येथील सातारा जिल्हा कारागृहातील आणखी दोन कैदी कोरोनाबाधित निघाले. यामुळे कारागृहातील बाधित कैद्यांची संख्या 4 झाली आहे. साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून 45 कैदी सातारा कारागृहात ट्रान्सफर करण्यात आले होते, हे चौघेही त्यातीलच आहेत.
सातारा जिल्हा कारागृहातील आणखी दोन कैदी कोरोनाबाधित फलटण तालुक्यातील 6 वर्षांच्या मुलासह आज तीन रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 77 झाला आहे. पुण्यावरून साताऱ्यातील कारागृहात आलेल्यांतील दोघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे रविवारी अहवालात स्पष्ट झाले. यातील एक ३१ तर दुसरा ५८ वर्षीय कैदी असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. दोन्ही बाधितांना क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येरवडा कारागृहातील काही कैदी राज्यात अन्यत्र हलविण्यात आले. त्यातील 45 कैदी सातारा जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले होते. ज्यांची हिस्ट्री प्रवासाची आहे, अशांचे स्वॅब आरोग्य यंत्रणा घेत असते. त्यानुसार सातारा जिल्हा कारागृहातील 25 कैद्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील दोघे काल(शनिवार) तर आज दोघे बाधित असल्याचा वैद्यकीय अहवाल आला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय 40, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 16 अशा 56 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले. आता सातारा जिल्ह्यात 66 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर, 9 जणांना कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 77 बाधित रुग्ण आढळले आहेत.