कराड (सातारा) - आपण ज्या शहरात राहतो, ते शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यमय असावे, या भावनेने तृतीयपंथीयांनी कराडमधील प्रमुख रस्त्यांवरून फेरी काढत जनजागृती केली. स्वच्छता आणि जनजागृतीसाठी तृतीयपंथीयांनी घेतलेला पुढाकार कराडमध्ये कौतुकाचा विषय ठरला आहे.
कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत एक लाख लोकसंख्येहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सलग दोनवेळा देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिसर्यांदा देशात प्रथम क्रमांक पटकावून हॅट्ट्रीक करण्यासाठी कराड नगरपालिका नव्या जोमाने कामाला लागली आहे. स्वच्छतेसाठी कराडकरसुध्दा एकवटले आहेत. समाजातील दुर्लक्षित आणि संख्येने कमी असणारे तृतीयपंथीयसुध्दा या मोहिमेसाठी सरसावल्याने स्वच्छ कराड मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे. तृतीयपंथीयांचा श्री रेणुकादेवी नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीमध्ये आपला सहभाग नोंदवला.
आपण ज्या शहरात राहतो, वावरतो त्या समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेने तृतीयपंथीयांनी स्वच्छ कराड आणि कोरोना जनजागृतीमध्ये सहभाग घेऊन शहरातून फेरी काढण्याचा निर्णय घेतला. ही संकल्पना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह नगरसेवकांना सांगितली. त्यांना तृतीयपंथीयांच्या संकल्पनेचे कौतुक वाटले. त्यांनी फेरीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. स्वच्छ कराड, सुंदर कराड, माझे कुटुंब, माझी जबाबदारी, अशा घोषणा देत तृतीयपंथीयांनी कराडच्या प्रमुख रस्त्यांवरून फेरी काढत जनजागृती केली. तसेच घरोघरी जाऊन महिलांना स्वच्छता राखून माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेतील नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले.
जनजागृतीसाठी तृतीयपंथी उतरले रस्त्यावर
'समाजाची काळजी घेणे आहे आपली जबाबदारी, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतर पाळून घेऊया सर्वजण खबरदारी, माझे कुटुंब, माझी जबाबदारी', हा रॅलीतील फलक लक्षवेधी होता. या रॅलीने कराडकरांचे लक्ष वेधले. कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीदेखील या रॅलीत सहभागी झाले होते.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या, स्वच्छता मोहिमेसाठी प्रत्येकजण योगदान देत आहे. तृतीयपंथीयांच्या श्री रेणुका ग्रुपने पुढाकार घेऊन जनजागृती केल्यामुळे कराडकरांचे बळ वाढले आहे. सर्वांच्या प्रयत्नामुळे यंदा कराड नगरपालिका स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये नक्की हॅट्ट्रीक करेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.