कराड (सातारा) -कराडमधील कृष्णा रुग्णालयातून सोमवारी (दि. 1 जून) कोरोनामुक्त झालेल्या 19 जणांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन डिस्चार्ज देण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे, फक्त कृष्णा रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या रूग्णांची संख्या आज शंभर झाली. कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा रुग्णालयाने दिलेल्या योगदानाचे जिल्हाधिकारी सिंह यांनी कौतुक केले.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विशेष वॉर्डमध्ये बाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. कराड तालुक्यात पहिला कोरोनाबाधित आढळलेला रूग्ण 18 एप्रिल रोजी कोरोनामुक्त होऊन घरी गेला. त्यानंतर कृष्णा रुग्णालयामधील यशस्वी उपचारामुळे तब्बल शंभर जण कोरोनामुक्त झाले. रविवारपर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या 81 होती. सोमवारी आणखी 19 जण कोरोनामुक्त झाल्याने कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा आकडा शंभरवर पोहोचला.
सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक, उंब्रज येथील 40 वर्षीय पुरूष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, शिरवळ (पाटण) येथील 26 आणि 25 वर्षीय महिला, भरेवाडी (कराड) येथील 36 वर्षीय पुरूष, बनपुरी (पाटण) येथील 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय युवक, 48 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय मुलगा, शितपवाडी (पाटण) येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा, 19 वर्षीय युवक, ढेबेवाडी फाटा (कराड) येथील 23 वर्षीय पुरूष, 44 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय तरूणी, अशा 19 जणांचा समावेश आहे.