कराड (सातारा) - गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील संगमनगर ते घाटमाथ्यापर्यंतच्या 13 कि. मी. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 16 कोटी 85 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या निधीसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
कराड-चिपळूण-गुहागर महामार्गावर पाटण तालुक्यातील संगमनगर ते घाटमाथा या 13 कि. मी. अंतराच्या कामासाठी 16.85 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली होती. कराड-पाटण मार्ग हा कोकणचे प्रवेशद्वार आहे. कोकणात ये-जा करणार्या वाहनांची संख्याही मोठी आहे. पाटण तालुक्यात जादा पाऊस पडतो. त्यामुळे या मार्गावर खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा होते. कोयना विभागासह डोंगरी भागातील लोकांना या मार्गावरून पावसाळ्यात प्रवास करणे अडचणीचे ठरते. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कोकणात जाणार्या नागरिकांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, या बाबी खासदार पाटील यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.