साातारा- म्हसवे (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाची त्याच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. गंगाराम रमेश राठोड (वय १२, रा. म्हसवे, ता. सातारा) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तो मंगळवारपासून बेपत्ता होता. त्यानंतर बुधवारी त्याचा मृतदेह आढळून आला.
खळबळजनक..! बारा वर्षांच्या मुलाची अल्पवयीन मुलाकडून दगडाने ठेचून हत्या - गंगाराम राठोड हत्या
शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने १२ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना म्हसवे येथे घडली आहे.
![खळबळजनक..! बारा वर्षांच्या मुलाची अल्पवयीन मुलाकडून दगडाने ठेचून हत्या Satara crime](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10146894-550-10146894-1609981952270.jpg)
गंगाराम हा मंगळवारी (५ जानेवारी) सायंकाळी घरासमोरून अचानक बेपत्ता झाला होता. मुलगा बराचवेळ घरी न आल्याने त्याच्या आईने शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. यामुळे आई ललिता राठोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती.
श्वानामुळे सापडला मृतदेह
दरम्यान बुधवारी सायंकाळी म्हसवे येथील एका ऊसाच्या शेताजवळ गंगारामचा पायमोजा घरातल्यांना आढळला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ श्वानाला पाचारण केले. श्वान घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला गंगारामच्या पायमोजाचा वास देण्यात आला. श्वान धावतच उसाच्या शेतातून पलीकडच्या शेतात गेले. त्या ठिकाणी गंगारामचा मृतदेह पोलिसांना आढळला. गंगारामच्या डोके, तोंड आणि छातीवर दगडाने घाव घालण्यात आले होते. त्याचा मृतदेह अगदी छिन्न आणि थरकाप उडवणारे दिसून आले. खुनाच्या या घटनेने परिसरात मात्र, खळबळ माजली होती.
शिवीगाळ केली म्हणून हत्या-
मृतदेहाशेजारी सात ते आठ दगड पडले होते. गंगारामचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सुत्रे हलवत तपास सुरू केला आणि ही हत्या नेमकी कोणी केली, याचा शोध लावला. या प्रकरणी पोलिसांनी गंगारामसोबत कायम असणाऱ्या त्याच्या १६ वर्षांच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी तो घाबरल्याने त्याने क्षणाचाही विलंब न करता खुनाची कबुली दिली. काही दिवसांपर्वूी गंगाराम आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला होता. त्यावेळी गंगारामने त्याला शिवीगाळ केली. याचा बदला म्हणून त्याने गंगारामचा खून केल्याची कबुली दिली.