सातारा- जिल्ह्यातील माण तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गत दोन वर्षांत माण तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील नदी, नाले, ओढे आणि तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या १०२ वर पोहोचली आहे.
माण तालुक्यात टँकरने ओलांडली शंभरी - सातारा
जिल्ह्यातील माण तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गत दोन वर्षांत माण तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील नदी, नाले, ओढे आणि तलाव कोरडे पडले आहेत.
![माण तालुक्यात टँकरने ओलांडली शंभरी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3220464-thumbnail-3x2-man.jpg)
माण तालुक्यात एकूण १०६ महसूली गावे असून त्यापैकी बहुतांशी गावांना दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. दुष्काळग्रस्तांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षभरापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच तापमानाचा पारा ४१ ते ४३ अंशांवर पोहचला आहे.
टँकरची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या ७३ गावे व ५४७ वाड्या-वस्त्यांमध्ये १ लाख ३४ हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी ढाकणे तलावात फिडिंग पॉईन्ट करण्यात आला आहे. तेथून टँकरमध्ये पाणी भरून संपूर्ण तालुक्याची तहान भागवली जात आहे. त्याबरोबरच तालुक्यातील २५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
- गोरे प्रतिष्ठानतर्फे मोफत पाणी पुरवठा-
माण तालुक्यातील शेखर गोरे प्रतिष्ठानमार्फत ५ मोठ्या आणि ७ लहान टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच यात्रा असणाऱ्या गावात २ टँकर व शहरातील मुख्य ठिकाणीही प्रतिष्ठानतर्फे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.