सातारा - उरमोडी धरण पाणवठा क्षेत्रात एका अत्यंत दुर्मिळ व विलुप्त समजण्यात येणाऱ्या चतुर ( ड्रॅगन/डॅमसेल फ्लाय) परिवारातील लेस्टेस पॅट्रिशिया या प्रजातीची तब्बल 100 वर्षांनंतर नव्याने नोंद करण्यात यश मिळाले आहे. 1922 साली या प्रजातीचा एकमेव नर किटक कर्नाटक येथील कूर्ग परिसरात आढळला होता. तो नमुना सध्या लंडन येथील नॅचरल हिस्टरी म्युझियम येथे आहे.
सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीराम भाकरे, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे व दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्रतिमा पवार-भोईटे यांनी ही किमया साधली आहे. जवळपास 100 वर्षे या प्रजातीचा पश्चिम घाटात शोध घेण्याचा अथक प्रयत्न अनेक संशोधक करीत होते, आहेत. निसर्गाचा मानव निर्मित विनाश बघून कदाचित ही दुर्मिळ प्रजाती कायमची विलुप्त झाली असावी अशी चर्चा संशोधकांमध्ये दीर्घ काळ सुरु होती. परंतु या नवीन शोधामुळे त्याच्या अस्तित्वास पुष्टी मिळाली आहे.
लंडन म्युझियममध्ये लेस्ट्स पॅट्रीशिया च्या नमुन्याशी ह्या नवीन नोंदविलेल्या उप-प्रजातीची तुलना करता त्याच्या शरीररचनेसह बाह्य अंगावरील ओळखणीच्या खुणा व वैशिष्ट्यांमध्ये मुख्यत्वेकरून फरक दिसून आला. त्यामुळे सदर प्रजाती ही सद्यस्थितीत लेस्ट्स पॅट्रीशियाचीच उपप्रजाती 'लेस्ट्स पॅट्रीशिया ताम्रपट्टी' या नावाने नोंदविण्यात आली आहे.
त्या संबंधीचा त्यांचा शोधनिबंध नुकताच 'बायो नोट्स' या राष्ट्रीय व मान्यताप्राप्त नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. कीटकांच्या जैव विविधतेचा दीर्घ काळापासून अभ्यास करणारे डॉ भाकरे , श्री व सौ भोईटे यांनी या प्रजातीचा शोध लावल्यामुळे, सातारा परिसरातील सूक्ष्मजैव विविधतेचे महत्व तसेच त्याच्या संवर्धनाची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
आपल्या आजूबाजूस आढळणारे अशा प्रकारचे सूक्ष्मजीव, कीटक हे नेहमीच मानवास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहाय्यभूत असतात. यावर अधिक संशोधन होऊन त्यांच्या जतनासाठीचे प्रयत्न अधिक जोमाने करणे गरजेचे आहे, अशा अपेक्षा पर्यावरण अभ्यासकांतून व्यक्त होत आहेत.