कराड (सातारा)- रविवारी (दि. 21 जून) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार कराड तालुक्यातील तीन आणि पाटण तालुक्यातील सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय दोन तरुण आणि 24 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कराड पंचायत समितीच्या एका माजी सभापतीसह त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुण, 11 वर्षांची मुलगी, हावलेवाडी येथील 28 वर्षीय तरुण, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय तरुणी आणि बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, अशा सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबई, पुणे आणि परराज्यात अडकलेले नागरिक पाटण तालुक्यातील आपल्या मूळ गावी येऊ लागल्याने कोरोनाबाधितांची साखळी वाढली आहे. त्यापूर्वी पाटण तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता.