सातारा:पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी अजिम सलीम पठाण (रा. रहिमतपूर, ता.कोरेगाव) आणि त्याचा साथीदार अजित अण्णाप्पा तिपे (रा. कोल्हापूर) यांनी परराज्यातून चोरून आणलेली चारचाकी वाहने सातारा, रायगड जिल्ह्यात विक्री केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबर्याकडून मिळाली. त्यांनी आरोपींना ताब्यात घेण्याची सूचना सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील यांना केली. त्यानुसार पोलिसांनी अजिम पठाण याच्या ठावठिकाण्याची माहिती मिळवली. त्याला रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथून ताब्यात घेऊन शाहुपूरी हद्दीतील गुन्ह्यामध्ये अटक केली.
दिल्ली, उत्तर प्रदेशातून चोरल्या मोटारी:अजिम पठाणने त्याचा साथीदार अजित तिपे याच्या सोबत सातारा, दिल्ली, उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटारी चोरून त्यांची सातारा, रायगड जिल्ह्यात विक्री केल्याची कबुली दिली. शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वॅगर आर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून 1 इनोव्हा क्रिस्टा, 4 क्रेटा, 1 मारुती ब्रिझा, 1 होंडा सिटी, 1 मारुती स्विफ्ट, 1 मारुती बलेनो, अशा 1 कोटी 15 लाख रूपये किंमतीच्या 10 कार चोरल्याची कबुली संशयितांनी दिली.
दुचाकी चोरीप्रकरणी पाच जणांना अटक:दुचाकी चालकास मारहाण करून त्याच्या खिशातील पैसे आणि मोपेड बळजबरीने चोरून नेल्याचा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात नोंद होता. याप्रकरणी महेश रामचंद्र अवघडे (रा.कोडोली, ता. सातारा), संतोष मारुती बाबर (रा. बाबाचीवाडी, ता. कोरेगाव) वैभव प्रमोद बाबर (रा.कोंडवे, ता. सातारा), कृष्णत रत्नकांत काकडे (रा. मसूर, ता. कराड), आणि अमित राजेंद्र बैले (रा. उंब्रज, ता.कराड) या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी सातारा शहर, पाटण, किणी टोलनाका तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या 3 लाख 20 हजार रूपये किंमतीच्या 7 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
राजधानीतून चारचाकींची चोरी:सातारा एलसीबीने अटक केलेल्या दोन सराईत चोरट्यांनी दिल्लीच्या विविध परिसरातून महागड्या चारचाकी चोरल्या. चोरट्यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाणे पूर्व दिल्ली, किडवाईनगर पोलीस ठाणे दक्षिण कानपूरनगर, भारतनगर पोलीस ठाणे उत्तर दिल्ली, गीता कॉलनी शहादरा दिल्ली, पंजाबी बाग पोलीस ठाणे दिल्ली, पटेलनगर पोलीस ठाणे दिल्ली, राजुरी गार्डन पोलीस ठाणे दिल्ली, राजेंद्र नगर दिल्ली, लाजपतनगर दिल्ली, शाहुपूरी पोलीस ठाणे सातारा आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संशयितांनी महागड्या कार चोरल्या आहेत.
हेही वाचा:Sanjay Raut On Sharad Pawar : निवड समितीचा निर्णय अपेक्षित होता, शरद पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही - संजय राऊत