सांगली- अनैतिक संबंधातून मारेकऱ्यांनी तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना कुपवाडमधील शिवशक्ती नगरमध्ये मंगळवारी सकाळी घडली. सचिन आण्णासाहेब सुतार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तीन हल्लोखोरांनी सचिनवर सुऱ्याने तब्बल ५८ वार केल्याने तो जागीच ठार झाला. दरम्यान खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अनैतिक संबंधातून भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून, मारेकऱ्यांनी सुऱ्याने केले तब्बल ५८ घाव - कुपवाडमधील शिवशक्ती नगर
कुपवाडमधील शिवशक्ती नगरमध्ये मंगळवारी सकाळी अनैतिक संबंधातून मारेकऱ्यांनी तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून केला. खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मिरज रस्त्यांवरील शिवशक्ती नगरमध्ये मंगळवारी सकाळी सचिन आण्णासाहेब सुतार (वय 30, रा. शिवशक्ती नगर) हा दुचाकीवरुन आपला मेहुणा चंद्रकांत सुतार व एका कामगारासह जात होता. यावेळी चरणराज मोहिते, सारंग मोहिते व पुटय्या हे तिघेजण एका दुचाकीवरून आले. त्यांनी सचिनवर हल्ला केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यात सचिनवर एकामागून एक असे ५८ वार केले. त्यामुळे सचिन हा जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती मिळताच मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल आणि कुपवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नीरज उबाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवला. या प्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.