सांगली -दुष्काळी आटपाडी तालुक्यात संकेत मोरे या पदवीधर तरुणाने तलावात तरंगता पिंजरा पद्धत मत्स्य संवर्धन प्रकल्प उभारला आहे. या तरंगत्या मत्स्य पालन प्रकल्पातून वार्षिक 100 टन माशांच्या उत्पादनाची हमी आहे. तलावातील शाश्वत मत्स्य शेतीचा हा पहिलाच प्रकल्प असून, जिल्ह्यातील तरुणांसाठी हा पथदर्शी बनला आहे.
दुष्काळी तालुक्यात मत्स्य शेती -
आतापर्यंत आपण मत्स्य शेतीचे अनेक प्रकार पाहिलेत. पण, सांगलीतील आटपाडीमधील संकेत शिवाजीराव मोरे या तरुणाने पिंजरा पद्धत मत्स्य शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. एकेकाळी दुष्काळी भाग म्हणुन ओळख असलेल्या आटपाडी तालुक्यात हा अऩोखा प्रयोग केला आहे. टेंभू योजनाचे पाणी आटपाडी तालुक्यात पोहचले आहे. सर्व तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मानदेशाच्या या डोंगराळ भागातील तलावात हा मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. संकेत उच्चशिक्षीत असून, मेकॅनिकल पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने नोकरीच्या मागे न लागता आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य शेती करण्याचे ठरवले.
संकेतचे वडील शासकीय तलावात टेंडर घेऊन त्यात मत्स्य बीज सोडून उत्पादन घेत होते. पण, कधी पाणी आटून तर कधी तलावातील पाणी वाढले की मासे वाहून जायचे, वेळेवर मासे सापडायचे नाहीत. त्यामुळे संकेतने आधुनिक पद्धतीने मत्स्य शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संकेतने केंद्रीय मत्स्य विभागाच्या माध्यमातून कोलकाता, तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणांहून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर थेट आपल्या गावी येऊन महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आटपाडीनजीकच्या कामथ येथील तलावात पिंजरा पद्धतीने मत्स्य पालना प्रकल्प उभारला आहे.