सांगली - माजी नगरसेवकाच्या खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून तरुणाने मिरज पोलीस ठाण्याच्या आवारात तीन दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे आज निधन झाले. मोहसीन बागवान असे या युवकाचे नाव आहे.
सांगलीच्या मिरजेमध्ये मोहसीन बागवान या तरुणाने मिरज शहर पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर मोहसीनला त्याच्या मित्रांनी तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. आत्महत्या करण्यापूर्वी मोहसीन बागवान याने एक चिट्ठी लिहिली होती. ही चिट्ठी पोलिसांना सापडली असून यामध्ये त्याने माजी नगरसेवक साजिदअली पठाण व त्याचा भाऊ बबलू पठाण यांच्याकडून २० टक्क्यांनी ५० हजारांचे कर्ज घेतले असल्याचे सांगितले होते. यापोटी आपण १ लाख ७५ हजार रुपये दिले होते. तरी सुद्धा पठाण बंधुंकडून पैशासाठी तगादा लावण्यात आला असून त्यांच्याकडून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मजकूर चिट्टीमध्ये नमूद केला होता.