सांगली - जत तालुक्यातील करजगी येथे बोर नदीत ट्रॅक्टर ट्रॉलीतून पुरामध्ये तरूण वाहून गेला होता. तरूणाच्या मृत्यूप्रकरणी दोघांविरोधात उमदी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर चालक सोमू लायाप्पा कळ्ळी आणि दुध संकलन केंद्राचे व्यवस्थापक निंगाप्पा जोगर या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून सोमू लायाप्पा कळ्ळी यास ताब्यात घेतले आहे.
ट्रॉलीतून वाहून गेलेल्या तरुणाच्या मुत्यूप्रकरणी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - सदोष मनुष्यवधाचा गुन्हा बातमी
बोर नदीला आलेल्या पुरामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीतील एक तरूण वाहून गेला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंटू उर्फ परमेश्वर भीमू धायगुडे (वय 32, सनमडी) असे पुरात वाहून गेलेल्या तरूणाचे नाव आहे. पिंटू हा दूधाच्या पीक अप गाडीवर चालक होता. सनमडी येथून दूध संकलन करून करजगी येथील चेन्नई डेअरीचा व्हटसन चिलींग प्लाँटला दुध वाहतूक करीत होता. त्यानंतर कंपनीकडून ट्रॅक्टरने दूध वाहतूक करण्यात आली. करजगी -भिवर्गी पूलावरुन दोन खेपा नेण्यात आल्या होत्या. परंतु तिसऱ्या खेपेला पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. चालक सोमनिंग लायाप्पा कळ्ळी याने उडी मारल्याने सुदैवाने बचावला. मात्र ट्रॉलीतील पिंटू धायगुडे वाहून गेला. तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला.
बोर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही धोका पत्करून दुधाची वाहतूक करण्यात आली. कारण कंपनीने दूध घालण्यासाठी बळजबरी केली. त्यामुळेच परमेश्वरचा दुर्देवी मुत्यू झाला, असा आरोप भाऊ नितीन धायगुडेंनी तक्रारीत केला आहे. त्यानुसार उमदी पोलीस ठाण्यात दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.