सांगली - वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी गावातील गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील इतर गावांनी येडेनिपाणीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी केले.
येडेनिपाणी गावातील मंडळे यंदा करणार नाहीत सार्वजनिक गणेशोत्सव - yedenipani public ganeshotsav
वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी गावातील गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असून उत्सव काळात रोगाचे संक्रमण वाढू शकते. त्यामुळे घरीच गणपती बसवावा. मोठा उत्सव साजरा करण्यापेक्षा आरोग्यदायी व विधायक उपक्रम राबविण्यात यावे, असे आवाहन काटे यांनी केले. तसेच सध्या कोरोनामुळे दुकानदार, व्यापारी आणि सर्व स्तरातील लोकांवर आर्थिक मंदीचे संकट आहे. तर काही मंडळानी अगोदरच कारागिरांना मोठ्या मूर्तीच्या ऑर्डर दिल्या होत्या. मात्र, मोठ्या मूर्तीवर बंदी असल्याने कुंभार बांधवाना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गावात एकूण 20 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. सरपंच डॉ.सचिन पाटील, पोलीस पाटील बाबासाहेब गुरव, शिराळा पश्चिम विभागाचे अध्यक्ष सी.एच.पाटील यांनी उपस्थित मंडळांना मार्गदर्शन करत मंडळांच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष एस.आर.पाटील, हेड कॉन्स्टेबल अर्जून पाटील व भूषण महाडिक आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.