महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याच्या राज्यपालपदी बसलेला माणूस विक्षिप्त - यशोमती ठाकूर

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्यावतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

यशोमती ठाकूरांची राज्यपालांवर टिका
यशोमती ठाकूरांची राज्यपालांवर टिका

By

Published : Feb 4, 2021, 9:45 PM IST

जत (सांगली) - राज्याच्या राज्यपालपदी बसलेल्या विक्षिप्त माणसामुळे अडचणी येत आहेत, अशी घणाघात टीका महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे. सांगली जिल्ह्यातील जत येथे एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यशोमती ठाकूर
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्यावतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उपस्थिती लावली होती. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्यावर आरोप-

सांगली जिल्ह्यातील कृषी विद्यालयाच्या मागणीवरून बोलताना यशोमती ठाकूर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा हवाला देत, "दादांनी मला संगीतले आहे, एक विक्षिप्त असा माणूस राज्याच्या राज्यपालपदी बसला आहे. तसेच मीडियावाल्यांना दाखवयाचे आपण संविधानाने जोडले गेलो आहे. पण संविधानावर प्रश्न निर्माण करून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणार माणूस राज्यपाल म्हणून बसला आहे. याठिकाणी कृषी विद्यालय निर्माण करण्यासाठी ते अडचणी आणत आहेत," असा आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केला आहे.

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल दिसतील-

दादा भुसे म्हणाले, विश्वजीत कदम व आमदार सावंत माझ्याकडे सतत येत असतात जतच्या शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न ते मांडत असतात. वास्तविक माझाही निम्मा तालुका जत सारखाच आहे. त्यामुळे दुष्काळाचे चटके मी जाणून आहे. त्यामुळे या तालुक्याला कृषी विभागाचा निधी देताना माझा मतदारसंघ समजून देण्यात येईल. पाण्याच्या बाबतीत आम्ही सर्व मंडळी सोबत आहोत. मुख्यमंत्र्यांना बोलून येत्या चार वर्षात इथली योजना मार्गी लावण्याचे काम केले जाईल.

मंत्री विश्वजीत कदम यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला-

मंत्री कदम जतच्या दुष्काळाचा संघर्ष सांगताना म्हणाले, आज विक्रम दादांना राजकीय संघर्ष करावा लागतो. आमचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. आम्ही सगळे एक दिलाने आहोत. परंतु इथे जरा वेगळेच असते विक्रम दादा म्हटले की कोण कुणाशी हातमिळवणी करेल. हे सांगता येत नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

दुष्काळी जतला पाणी द्या-

सावंत म्हणाले, जतला म्हैसाळ योजनेचे पाणी येण्यास 40 वर्षे गेली. आता कुठे 20 टक्के भाग सिंचनाखाली आला आहे. अजून 80 टक्के भाग कोरडा आहे. या भागाला पाणी मिळावे म्हणून सतत आमचा संघर्ष सुरू आहे. आम्ही प्रस्तावित केलेली तुबची योजना आहे. ती परवडणारी असल्याचे सिद्ध झाले आहे. यातून किमान पावसाळ्यात तरी तलाव भरून देण्यासंदर्भात कायदेशीर पूर्तता व्हावी ही मागणी आहे.

हेही वाचा-विधानसभा अध्यक्ष दिल्लीतून ठरवला जाईल - अस्लम शेख

ABOUT THE AUTHOR

...view details