सांगली - थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या कामगारांना गुरूवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. गेल्या ११ महिन्यांपासून महांकाली कारखान्याकडून कामगारांचे वेतन थकवण्यात आल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. तातडीने वेतन न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.
११ महिन्यांचे वेतन थकीत, महांकाली साखर कारखान्याच्या कामगारांची तहसील कार्यालयावर धडक - sarfaraj sanadi
विविध मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या सुमारे ६०० कामगारांनी काम बंद करत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर करखान्याकडून कामगारांचे वेतन थकवण्यात आल्याचा प्रकार घडली. सुमारे ३०० हून अधिक साखर कामगारांचे वेतन महांकाली साखर कारखाना प्रशासनाकडून अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, प्रशासनाकडून वेतनाबाबत कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने कामगारांनी गुरूवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी मोर्चात शेकडो कर्मचारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी झाले होते.
कारखाना प्रशासनाकडून थकवण्यात आलेले वेतन तातडीने देण्यात यावे, फंड आणि ग्रॅच्युटीच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर कारखाना प्रशासनाकडून थकीत पगार जर तातडीने देण्यात आला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना महांकाली कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन छेडेल. तसेच प्रसंगी पुढील हंगामात कारखानाही सुरू होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.