सांगली - आई, पत्नी, बहीण, मैत्रीण ही नाती जशी स्त्री उत्तम प्रकारे सांभाळू शकते, तशी ती उच्च पदावर राहून समाजातील नागरिकांच्या हिताबरोबर आपल्या कुटुंबाचे हित जोपासू शकते. एकाच वेळी सरकारी काम आणि कुटुंबाकडे लक्ष देण्याची हिंमत फक्त एक महिलाच करू शकते. ते इस्लामपूर मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार पवार यांनी करून दाखवले आहे.
इस्लामपूर मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार पवार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवल्याने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्याधिकारी म्हणून इस्लामपूर नागरिकांच्या जीवाची सुरक्षितता जितकी महत्त्वाची तितकीच आपल्या कुटुंबाचीही. दिवस रात्र बाहेर असल्याने कोरोनाचा धोका आपल्या निरागस मुलांना व घरातील कोणालाच होऊ नये, म्हणून त्या गेले एक महिन्यापासून स्वतः आपल्याच घराच्याबाहेर शिडी लावून दुसऱ्या मजल्यावर जाऊन राहत असून, त्यांनी आपल्या कुटुंबाला आपल्यापासून लांब ठेवले आहे.
आपल्या चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी पाहा काय करतात इस्लामपूरच्या 'मुख्याधिकारी' एखादी महिला अधिकारी म्हटलं, की ती काय काम करते यापेक्षा तिला किती मर्यादा आहेत, यावरच जास्त लक्ष दिले जाते. तिच्या कामातील त्रुटी शोधल्या जातात आणि एकूणच हे कसे निरुपयोगी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा त्या इस्लामपुरात मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्या तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की, आता या काय करणार? किती टिकणार? त्यांनी कोरोनासारख्या भयंकर संकटात आपल्या कामाची चुणूक दाखवत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. आता इस्लामपूरचे नागरिक त्यांना 'लेडी सिंघम' म्हणू लागले आहेत.
आपल्या चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी पाहा काय करतात इस्लामपूरच्या 'मुख्याधिकारी'
मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार या मूळच्या कऱ्हाडच्या. सोलापूर जिल्ह्यातून त्यांची बदली वर्षभरापूर्वी इस्लामपूरला झाली. शहराच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी म्हणून त्या रुजू झाल्या. आजवर या पदावर इथे काम करणाऱ्यांनी मोठमोठ्या पदांवर मजल मारली आहे. कामातून नावलौकिक मिळवला आहे. पवार आल्या तेव्हा महापुराची स्थिती होती, त्यामुळे त्यांना फार काम करता आले नाही. त्यानंतर त्यांना जिल्ह्यातील आणखी पालिकांची अतिरिक्त जबाबदारी मिळाली, तेव्हाही त्या गुंतून पडल्या. पण कोरोनाची साथ आली आणि त्यांची परीक्षा सुरू झाली. धडाधड रुग्णांची संख्या वाढत जाऊन 25 वर थांबली आणि राज्यात इस्लामपूर चर्चेत आले. मुख्याधिकारी पवार यांनी हे शिवधनुष्य पेलले. पदाधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकारी सोबत असले तरी शहर म्हणून त्यांच्यावर विशेष भार होता. त्यांनी न डगमगता आपल्याकडे जितके मनुष्यबळ उपलब्ध आहे त्यावर नियोजन केले.
औषध फवारणी असो की त्या सर्व रुग्णांचे नियोजन असो, त्या सर्वांना सामोऱ्या गेल्या. या काळात त्यांनी आपल्यासोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढवले. त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली आणि महत्त्वाचे म्हणजे विश्वास दिला. कठीण काळात हे खूप महत्त्वाचे असते. काही वेळा रात्ररात्रभर त्या झोपल्या नाहीत. त्यांना दोन लहान मुली आहेत. त्यांची जबाबदारी पतीवर सोपवून त्या इकडे झटत होत्या. जरी फिल्डवर असल्या तरी वैयक्तीक घरातला स्वतःचा वावर मात्र त्यांनी क्वारंटाईन करून घेतला होता. इस्लामपुरात त्या ज्या इमारतीत राहातात त्याच्या वरच्या मजल्यावर आपल्या महिला अधिकाऱ्यांसोबत त्या अजूनही राहात आहेत. मुलींना लांबून भेटणे, बोलणे हा प्रकार सुरू आहे.
इस्लामपूर मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार पवार रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने त्या बाहेरच्या बाहेरून एका शिडीवरून ये-जा करत होत्या. लोकांना अधिकारी, त्यांना मिळणारा मान, मरातब दिसतो, पण संकटसमयी हे जे दिव्य करावे लागते, त्या त्यागाचा अनुभव जोवर स्वतःला मिळत नाही तोवर समजत नाही.
सर्वांकडून प्रशंसा!
नगरपालिकेत 3 राजकीय गट आहेत. या सर्वांना सांभाळण्याची कसरत सर्वच अधिकाऱ्यांना करावी लागते. तशी ती पवार यांनीही केली. एरवी कुणी ना कुणी नाराजी व्यक्त करतातच. पण कोरोनाच्या संकटात मुख्याधिकारी पवारांच्या कामाबाबत मात्र सर्वांकडून प्रशंसाच सुरू आहे.