सांगली Theater In Every Taluka : राज्यातील नाटकांचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नाट्यगृह उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प असल्याचं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. यासह दुर्दशा झालेल्या नाट्यगृहांच्या सुधारणेसाठीही निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते सांगलीमध्ये १०० व्या अखिल भारतीय नाट्य मराठी संमेलनाच्या मुहुर्तमेढ सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
शताब्दी मुहूर्तमेढ सोहळा : सांगलीमध्ये यंदाच्या १०० व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. विष्णूदास भावे नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात शताब्दी मुहूर्तमेढ सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी, नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, अभिनेता आणि नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामले तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. यावेळी प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते संहिता पूजन पार पडलं.