सांगली- प्रत्येक पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू. त्यासाठी शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना घेऊन सरकार विरोधात आज सांगलीमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
हा मोर्चा विश्राम बाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, स्वाभिमानीचे नेते विशाल पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांच्यासह हजारो पूरग्रस्त नागरिक, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, आज पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये सरकार दिरंगाई करत आहे. पण प्रत्येक पूरग्रस्ताला मदत मिळाली पाहिजे. आम्ही प्रत्येक पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू आणि यासाठी शेवटपर्यंत टोकाचा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. तर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी बोलताना पुरातील नुकसान खूप मोठे आहे. मात्र, सरकारला याचे गांभीर्य कळले नाही आणि पूरग्रस्तांच्याबाबतीत सरकारची संवेदनशीलता दिसून येत नाही, अशी टीका कदम यांनी केली आहे.