सांगली - दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.सांगलीच्या जतमधील सोन्याळमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.
दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केला खून; सांगलीच्या जत तालुक्यातील घटना - पोलीस
सांगलीच्या जत तालुक्यातील सोन्याळ येथील लकडेवाडी येथे पत्नीकडून पतीचा खून झाल्याची घटना घडली आहे. दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळून हा खून करण्यात आला आहे.
सोमन्ना उर्फ सोमलिंग पुजारी (वय ५५) असे मृत पतीचे नाव आहे. सोमन्ना यांच्याकडून दारू पिऊन पत्नी निलव्वा यांना वारंवार त्रास देण्यात येत होता. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून निलव्वा यांनी हा खून केला. मृताच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
यानंतर उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उमदी पोलिसांनी निलव्वा या महिलेला अटक केली आहे. पुजारी यांना मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. तर मुलगा आपली पत्नी आणि मुलासह कर्नाटकमधील तिकोटा येथे रोजंदारीवर जातात. दरम्यान, या घटनेमुळे उमदीमध्ये खळबळ उडाली आहे.