सांगली- येथली जत तालुक्यातील बिळूरमध्ये अनैतिक संबंधाच्या संशायावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. खून करून पतीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा केल्याचे सांगितले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-सुडाचे राजकारण करु नये, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
कस्तुरी मलप्पा पाटील (वय 51) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर मल्लप्पा पाटील असे पती आरोपीचे नाव आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती- पत्नीत वारंवार भांडण होत होते. पत्नी गेल्या दीड वर्षांपासून माहेरी कर्नाटकातील कोटलगी गावात राहत होती. नातेवाईकांनी दोघांचे संशय दूर करून गेल्या चार महिन्यापासून पती-पत्नीला एकत्र ठेवले होते.
दरम्यान, सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास बिळूरमध्ये त्याच कारणावरून परत त्यांच्यात वाद झाला. यातून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पतीने थेट पोलीस ठाणे गाठत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहेत.