महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कृष्णा नदी' पडली कोरडीठाक; सांडपाण्यामुळे नदीला गटारगंगेचे रूप - sangli flood

सहा महिन्यांपूर्वी महापूर आलेली कृष्णा नदी आता कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यातच सांगली शहरातलं सांडपाणी मिसळत असल्याने कृष्णा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

krushna river sangli
'कृष्णा नदी' पडली कोरडीठाक

By

Published : Feb 2, 2020, 2:55 AM IST

सांगली - अवघ्या सहा महिन्यांपूर्वी महापूर आलेली कृष्णा नदी आता कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यातच सांगली शहरातलं सांडपाणी मिसळत असल्याने कृष्णा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर, कोरड्या पडलेल्या नदीपात्रात वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे.

'कृष्णा नदी' पडली कोरडीठाक

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सांगलीच्या कृष्णा नदीला महापूर आला होता. त्यानंतर दुथडी भरून वाहणारी कृष्णा नदी सध्या कोरडीठाक पडली आहे. कोयना धरणातून कृष्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आलेलं नाही. त्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे. परिणामी कृष्णा नदी कोरडी पडली आहे. तर, याच कृष्णा नदीच्या पात्रामध्ये सांगली शहरातील लाखो लिटर सांडपाणी खुलेआमपणे मिसळत आहे .परिणामी कृष्णा नदीचे रूपांतर गटारगंगेमध्ये झाले आहे. काही महिन्यापूर्वी कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तसेच प्रदूषण महामंडळाने सांगली महापालिकेला नोटीस बजावली होती. मात्र, केवळ जुजबी कारवाई आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचे पालिका प्रशासनाचे काम नेहमीच राहिले. त्यामुळे कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न हा रेंगाळत राहिला आहे.

वाळूमाफियांचा हैदोस -

दुसऱ्या बाजूला कोरड्या पडलेल्या या कृष्णेच्या पात्रात वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे. कृष्णेच्या पात्रातील वाळू मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास चोरी करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत, तर या चोरीकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळे नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. अजून उन्हाळा लांब आहे, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातचं कृष्णा नदी कोरडी पडल्याने ऐन उन्हाळ्यात सांगलीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार ,हे नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details