सांगली - शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने धरणातून 4200 क्यूसेकचा पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू करण्यात आला आहे. धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम, पूरामुळे वारणेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम असून धरणातून 4200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तर, गेल्या 24 तासात याठिकाणी अतिवृष्टी झाली असून १३० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. 87 टक्के धरण सध्या भरले आहे, तर दुसऱ्या बाजूला धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरण प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग गुरुवारपासून सुरू केला आहे.
धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले, असून धरणाच्या मुख्य दरवाजातून 2500 क्यूसेक आणि धरणाच्या वीज निर्मितीवर रेडीयाल गेटमधून 1700 असा एकूण 4 हजार 200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. तर धरणातून करण्यात येत असलेला पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.