सांगली- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. सांगली मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले आहे. गतवेळ पेक्षा यंदा १ टक्का मतदान वाढल्याने हा वाढलेले टक्का कोणाला धक्का देणार, याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली असून २३ मे रोजी याचा फैसला होईल आणि सांगलीच्या मतदाराने आपला खासदार म्हणून कोणाला निवडले याचेही चित्र स्पष्ट होईल.
तिसऱ्या टप्प्यातील सांगली लोकसभेसाठी मंगळवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे उडालेला गोंधळ वगळता मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे. यंदाच्या या मतदारसंघात निवडणूक रिंगणात १२ उमेदवार होते. मात्र, खरी लढत भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातच तिरंगी लढत झाली. यावेळी चुरशीने झालेल्या या निवडणुकीत ६५ टक्के इतके मतदान झाले आहे. गत वेळी मोदी लाटेत ६३.६८ टक्के इतके मतदानाची नोंद झाली होती. मात्र, गतवेळी पेक्षा यंदा सव्वा टक्क्याने वाढ झाली असून हा वाढलेले मतदानाचा टक्का कोणाला धक्का देणार याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.